Ad will apear here
Next
पुनर्जन्माचं तेज देणारी ‘आरती’
कोणी तरी आपला हाताशी आलेला मुलगा अपघातात गमावलेला असतो; पण त्या मुलाचं हृदय ‘त्यांच्या’ प्रयत्नांमुळे दुसऱ्या शरीरात धडधडू लागतं.... कोणाला तरी नवं मूत्रपिंड मिळतं, तर कोणी तरी नव्या यकृतामुळे नवं जीवन जगू लागतो... या सगळ्यांना पुनर्जन्माचं तेज देणारी व्यक्ती असते आरती गोखले... स्त्री जन्म देऊ शकते, तर पुनर्जन्म का नाही देऊ शकत? ‘तुजऐसी नाही’ या मालिकेत आज पाहू या पुण्याच्या विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या समन्वयक आरती गोखले यांच्याबद्दल...
..........
‘‘आणि हृदय धडधडू लागलं आहे...’ हा निरोप मिळाला आणि त्या क्षणी काय वाटलं ते शब्दांत नाही सांगता येणार. आनंद, समाधान अशा सगळ्या भावनांची मनात दाटी झाली होती. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं वाटलं...’ आरती गोखले सांगत होत्या. पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या (झेडटीसीसी) मुख्य समन्वयक म्हणून त्या गेली पाच-सहा वर्षं काम पाहत आहेत. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ अशी स्थिती अनुभवत, मृत्यूनंतरही एखाद्याला अवयवदानाच्या माध्यमातून जिवंत राहता येण्याच्या किमयेतील त्या एक महत्त्वाचा दुवा आहेत.

दान ही संस्कृती असणाऱ्या आपल्या देशात रक्तदान, नेत्रदान अगदी रुळलेलं असलं, तरी अवयवदानाबद्दल, विशेषतः मेंदू मृत (ब्रेन डेड) व्यक्तीच्या अवयवदानाबाबत आजही फार माहिती नसल्याचं दिसतं. गेल्या चार-पाच वर्षांत, साधारण २०१२पासून अवयवदान चळवळ प्रकाशात आली आहे. या बाबतीत समाजात मोठ्या प्रमाणात समज, गैरसमज आहेतच; पण उदासीनता हा यातला मोठा अडथळा आहे. अलीकडे सरकारनंही अवयवदानाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पावलं उचलली आहेत. याचाच एक भाग म्हणजे केंद्रीय आणि राज्य पातळीवर, तसंच विभागीय पातळीवर अवयव प्रत्यारोपण समन्वय संघटना स्थापन करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राची जबाबदारी आरती गोखले सांभाळत आहेत. 

‘अवघ्या दोन तासांत हृदय पुण्यातून मुंबईला नेण्यात आलं. त्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता,’ अशा बातम्यांमुळे अलीकडेच पुणे अवयवदानाबद्दल प्रकाशझोतात आलं; मात्र पुण्यात याचा पाया १९९३मध्ये घातला गेला होता, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. १९९३मध्ये पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये पहिलं अवयवदान अर्थात नेत्रदान झालं. त्या वेळी नेत्रदान ही संकल्पनादेखील नवी होती. ‘रुबी’मध्ये नेत्रपेढी सुरू करण्यात आली. मृत रुग्णाच्या नातेवाईकांना नेत्रदानासाठी तयार करण्याचं काम आरती गोखले यांनी केलं. तिथून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आता पुण्यातील विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रमुखपदापर्यंत पोहोचला आहे. अपार संवेदनशीलता आणि दुर्दम्य आशावाद या आधारावर २०११पासून त्या ही धुरा सांभाळत आहेत. 
पूर्वाश्रमीच्या त्या पंकजा अभ्यंकर. समाजशास्त्रात पदवी घेतल्यानंतर त्यांनी  मेडिकल आणि सायकियाट्रीमध्ये ‘एमएसडब्ल्यू’ केले आणि १९९२पासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये वैद्यकीय समुपदेशक म्हणून काम सुरू केले. त्या वेळी एचआयव्ही- एड्सचा नुकताच उदय झाला होता. अशा रुग्णांना समजावणं, काळजी कशी घ्यायची हे त्यांना समजावून सांगणं हे काम त्या अत्यंत मनःपूर्वक करत; मात्र वैद्यकीय समाजसेवक किंवा समुपदेशक ही संकल्पनाच त्या काळी नवी होती, त्यामुळे त्यांना फार महत्त्व दिले जात नसे. डॉ. ग्रँट यांच्या प्रोत्साहनाने कामाला मान्यता मिळाली. १९९३मध्ये रुबी हॉलमध्ये नेत्रपेढी सुरू करण्यात आली आणि नेत्रदानासाठी मृत रुग्णांच्या नातेवाईकांचं मन वळविण्याची यशस्वी कामगिरी आरती गोखले यांनी पार पाडली. 

१९९४मध्ये आपल्या देशात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदेशीर झालं. १९९७पासून अवयवदानाला सुरुवात झाली. नऊ एप्रिल १९९७ रोजी मुंबईत मूत्रपिंड प्रत्यारोपणाची पहिली शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ११ एप्रिलला पुण्यातही अशी शस्त्रक्रिया पार पडली; पण अशा शस्त्रक्रियांचं प्रमाण त्या वेळी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकंच होतं. तसंच त्या वेळी ज्या हॉस्पिटलमधील मेंदू मृत रुग्णाचं अवयवदान केलं जात असे, त्याच हॉस्पिटलमधल्या गरजू रुग्णाला अवयव मिळत असत. बाहेरच्या रुग्णाला त्याचा लाभ होत नसे. यावर चर्चा होऊ लागली आणि एका मध्यवर्ती समन्वय संस्थेची गरज भासू लागली. यातूनच २००२मध्ये मुंबईत झेडटीसीसी (झोनल ट्रान्स्प्लांट को-ऑर्डिनेशन सेंटर) या बिगर सरकारी संस्थेची स्थापना झाली. त्याच वेळी आरती गोखले यांना अवयवदान व्यवस्थापन (डिप्लोमा इन ऑर्गन प्रोक्युअरमेंट) या विषयावरच्या अभ्यासासाठी बार्सिलोना विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली. जगभरातून आलेल्या ५२ विद्यार्थ्यांमधून त्यांना एकटीलाच ही शिष्यवृत्ती मिळाली होती. एका नवी उमेद घेऊन त्या परत आल्या आणि अवयवदान चळवळीतील एका महत्त्वाच्या भूमिकेचा श्रीगणेशा त्यांनी केला. त्या परत आल्यानंतर तब्बल तीन वर्षं एकही अवयवदान झालं नाही. अवयवदानाविषयी जागरूकता नसल्यानं लोक त्याचा विचारच करायचे नाहीत; मात्र धीर न सोडता आरती गोखले आणि या क्षेत्रातले त्यांचे सहकारी प्रयत्न करत राहिले. त्याचंच फळ आज दिसत आहे. आज राज्यात पुणे शहर अवयवदानात आघाडीवर आहे. त्यात आरती गोखले यांचा मोलाचा वाटा आहे. 

पुण्यात २००४मध्ये ‘झेडटीसीसी’ची स्थापना झाली; मात्र प्रत्यक्षात काम सुरू झालं ते २०१३मध्ये. त्याच्या प्रमुख म्हणून आरती गोखले यांच्याकडे संधी चालून आली. २०११मध्ये वडिलांच्या आजारपणामुळे त्यांनी ‘रुबी’तली नोकरी सोडली होती. कोणतीही नोकरी करण्याची त्यांची इच्छा नव्हती; पण वडिलांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याकरिता त्यांनी हे काम स्वीकारलं. ‘रुबी’मधल्या कामाचा प्रदीर्घ अनुभव, बार्सिलोनामधल्या अभ्यासक्रमाचं पाठबळ या आधारावर त्यांनी काम सुरू केलं.प्रथम सर्व हॉस्पिटल्समध्ये असलेल्या, अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची यादी एकत्रित करण्यात आली. अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी शिबिरं घेण्यात आली. त्याबरोबरच समन्वयकांना प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर आरती गोखले यांचं प्रत्यक्ष काम सुरू झालं.

त्यांचं रोजचं कामच खूप आव्हानात्मक आहे, जीवन-मृत्यूच्या खेळाशी निगडित आहे. एखाद्या रुग्णालयातल्या मेंदू मृत रुग्णाची माहिती मिळाली, की त्यांचं काम सुरू होतं. अखंड २४ तास त्यांना मोबाइलवर उपलब्ध असावंच लागतं. अवयवदानाचं सर्व काम आता ऑनलाइन होतं. यामध्ये दाता आणि गरजू रुग्ण यांची माहिती गुप्त ठेवली जाते. आरती गोखले फोनवरून संबधित रुग्णाचे नातेवाईक, डॉक्टर यांच्या सतत संपर्कात असतात. संबंधित रुग्ण मेंदू मृत झाल्याचा अहवाल मान्यताप्राप्त डॉक्टरांनी दिल्यानंतर त्या रुग्णाच्या नातेवाईकांकडून परवानगी घेणं; त्यात अडथळे आल्यास नातेवाईकांशी बोलून समजावणं, असं काम करावं लागतं. त्यांनी मान्यता दिल्यानंतर अवयव काढण्याची प्रक्रिया सुरू होते. रुग्ण असेल त्या हॉस्पिटलला अवयव काढण्याची परवानगी नसेल तर त्याला परवानगीप्राप्त रुग्णालयात हलवलं जातं. तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना आधी कल्पना दिली जाते. तिथं अवयव काढल्यानंतर अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची केंद्रीय यादी पडताळली जाते. कोणते अवयव मिळाले आहेत आणि कोणत्या रुग्णाला कोणत्या अवयवांची गरज आहे, त्यानुसार त्यांची विभागणी केली जाते. अवयव हवे असलेला रुग्ण ज्या हॉस्पिटलमध्ये असेल, त्या हॉस्पिटलशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली जाते. अवयव प्रत्यारोपणाची तयारी केली जाते. अवयव वेळेत संबंधित रुग्णालयात पोहोचण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधण्याचे कामही आरती गोखले करतात. शहरातले रस्ते आणि महामार्गावर वाहतुकीचे नियंत्रण करून ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार केला जातो. यासाठी पोलिसांशी सतत संपर्क ठेवून डॉक्टरांची टीम कुठपर्यंत आली आहे याची माहिती देणं, हॉस्पिटलच्या संपर्कात राहणं हे सगळं कामही आरती गोखले फोनवरून करत असतात. ‘ना जेवणखाण- ना झोप’ अशा प्रकारे युद्धपातळीवर हे काम चाललेलं असतं. अवयव गरजू रुग्णापर्यंत पोहोचतात, त्याच्यावर प्रत्यारोपण यशस्वी होते तेव्हा त्यांचे काम पूर्ण होते. ही क्षणाक्षणाची जीवन-मृत्यूची लढाई त्या लढत असतात... एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी आणि तेही अगदी निरपेक्षपणे. त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे गेल्या वर्षी दहा महिन्यांत दहा वेळा ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार करून अनेकांना पुनर्जन्म मिळाला आहे.

नुकतंच पुण्यातून पाठवलेलं एका मेंदू मृत रुग्णाचं हृदय मुलुंडमधल्या फोर्टिस रुग्णालयात एका गरजू रुग्णाला बसविण्यात डॉक्टरांना यश आलं. एका तरुण मुलाला नवा जन्म देता आला होता. त्या मुलाच्या शरीरात बसवल्यानंतर हृदय धडधडू लागल्याचा निरोप आरती गोखले यांना मिळाला आणि तब्बल चार दिवस चाललेली त्यांची लढाई यशस्वी ठरली. त्यांच्याच तोंडून हा प्रसंग ऐकताना अंगावर अक्षरशः शहारे येत होते. एका मेंदू मृत रुग्णाच्या शरीरातलं धडधडतं हृदय काढून ते अवघ्या काही तासांच्या अवधीत मुंबईला नेलं जातं. तिथं ते हृदयाची गरज असलेल्या एका रुग्णाला बसवलं जातं आणि मृत्यूशी झुंजणाऱ्या एका जिवाला नवजीवन मिळतं.... ही अद्भुत अशीच घटना आहे. अशा प्रकारे यकृत, किडनी आदी अवयवांचं दान यशस्वी झाल्यानंतर एखादा रुग्ण पुन्हा धडधाकटपणे आयुष्य जगण्यासाठी सज्ज होतो, तो क्षण अविस्मरणीय असतो. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असं वाटून जातं. अथकपणे काम करण्यासाठीचा हाच आपला ऊर्जास्त्रोत असल्याचं त्या सांगतात.त्यांच्या या कामात अनेकदा निराश करणारे अनुभवही येतात. अगदी शेवटच्या क्षणी मेंदू मृत रुग्णाचे नातेवाईक माघार घेतात, त्या वेळी आशेवर असलेल्या एका जिवाची होणारी निराशा मन विदीर्ण करून जाते; पण पुन्हा त्याच्यासाठी नवीन दाता शोधण्याचं काम नव्या जोमानं सुरू केलं जातं. कारण त्याचा जीव वाचवायचा असतो. कधी कधी अगदी शेवटच्या क्षणी अवयव मिळूनही वाट पाहत असलेल्या रुग्णाचा मृत्यू होतो, तेव्हाही खूप हताश वाटतं; पण थांबून चालत नाही. ते अवयव दुसऱ्या रुग्णाच्या कामी येतील हे लक्षात घेऊन तत्काळ संबंधित रुग्णालय, डॉक्टर यांच्याशी संपर्क साधण्याचं काम सुरू होते. एक एक मिनिट मोलाचं असतं. आरती गोखले नित्यनेमानं अशा थरारक आणि शारीरिक-मानसिक कस पाहणाऱ्या घटनांना सामोऱ्या जातात. 

‘लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं, त्यांची मानसिकता बदलणं हे मोठं आव्हान आहे. ग्रामीण भागातल्या लोकांकडून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे; मात्र त्या तुलनेत शहरी भागातील लोकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी आहे. उच्चशिक्षित असूनही लोक अवयवदान करण्यास नकार देतात. ही स्थिती विदारक आहे,’ अशी खंत त्या व्यक्त करतात. ग्रामीण भागात मात्र याबाबत उलट अनुभव येतो. लोक अवयवदान करण्यास मान्यता देत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. आपल्या देशात रस्ते अपघातांचं प्रमाण खूप आहे. त्यामध्ये तरुण मुलं बळी जाण्याचं प्रमाण अधिक आहे. अशा वेळी मेंदू मृत झाल्यानंतर त्यांचे अवयव किमान सात ते नऊ जणांना जीवनदान देऊ शकतात. केवळ रस्ते अपघात नव्हे, तर अन्य आजारांनी, अपघातानं मेंदू मृत झालेल्या ४५ वर्षांपर्यंतच्या व्यक्तीचं हृदय, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, डोळे, मूत्रपिंड आणि इतर ऊती (टिश्यू) अशा सात अवयवांचं दान करता येतं. सर्व धर्मांमध्येही अवयवदानाला सर्वाधिक मानवतावादी आदर्श म्हणून मान्यता आहे. त्यामुळे अवयवदानासारखं श्रेष्ठ दान करून अनेकांना जीवनदान देण्याकरिता पुढे येणं ही काळाची गरज आहे. याबाबतीत समाजात अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी सरकारतर्फे, तसंच स्वयंसेवी संस्था, हॉस्पिटल्स यांच्यामार्फत अनेक उपक्रम राबवले जातात. लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी आरती गोखले सातत्यानं प्रयत्न करत असतात. तरुण मुलांमध्ये याबाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी त्या स्वतः अनेक ठिकाणी जाऊन व्याख्यानं देतात. हॉस्पिटल्समध्ये असलेल्या अवयवदान समन्वयकांच्या कार्यशाळा घेतात. मार्गदर्शन करतात.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद अशी चार विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्रं आहेत. पुणे विभागाअंतर्गत कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, आदी शहरांचा समावेश असून, ३५ हॉस्पिटल्स अवयव काढणं आणि प्रत्यारोपण यासाठी मान्यताप्राप्त आहेत. सहा ते सात हॉस्पिटलमध्ये फक्त अवयव काढण्याचं काम केलं जाऊ शकतं. या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अवयवदान समन्वयक असतात. त्यांच्याकडे अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णाची नावनोंदणी केली जाते. प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळे निकष आहेत. कोणत्याही प्रकारची अट घालून अवयवदान केलं जात असलं, तर ते स्वीकारलं जात नाही. मेंदू मृत रुग्णाचं अवयवदान आणि जिवंत रुग्णाकडून केलं जाणारं अवयवदान हे दोन वेगळे प्रकार आहेत. आज विविध अवयवांसाठी एक हजारपेक्षा अधिक रुग्ण प्रतीक्षायादीत आहेत. गेल्या वर्षी ३० ऑगस्ट ते एक सप्टेंबर या कालावधीत अवयवदानाचं महाअभियान राबविण्यात आलं. अवयवदान हे श्रेष्ठ दान असल्याची महती पटविण्यासाठी, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. सरकार, समाजसेवी संस्था आपापल्या पातळीवर प्रयत्न करतच आहेत; पण खरी गरज आहे ती समाजानं पुढे येण्याची. 

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ असं म्हणतात. अवयवदानामुळे कुणाला तरी पुनर्जन्म देऊन आयुष्य सार्थ करण्याची संधी मिळत असेल तर मागे का हटायचं? नश्वर देह केवळ समज, गैरसमजांच्या जाळ्यात गुंतवून मातीमोल करण्यापेक्षा त्याचा सदुपयोग करणं केव्हाही योग्य नाही का? समाजात ही मानसिकता रुजवणं थोडं कठीण आहे; पण अशक्य नक्कीच नाही, याच दुर्दम्य आशावादावर आरती गोखले यांची लढाई सुरू आहे. त्यांच्या या ध्यासाला सलाम!

संपर्क : आरती गोखले 
इ मेल : ztccpune@gmail.com
............

(‘तुजऐसी नाही’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या  https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध असतील.)

(अवयवदानाबाबतचं आरती गोखले यांचं मनोगत पाहा सोबतच्या व्हिडिओत...)



(आरती गोखले यांच्या प्रवासाची झलक पाहा  सोबतच्या व्हिडिओत )



(अवयवदानाविषयी जागरूकता वाढावी या उद्देशाने तयार करण्यात आलेला ‘फिर जिंदगी’ हा चित्रपट जरूर बघण्यासारखा आहे.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZJBH
Similar Posts
एकाच यकृताने दिले दोघांना जीवदान; पुण्यात ‘स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट’ यशस्वी पुणे : स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांट अर्थात एकाच ब्रेनडेड रुग्णाच्या यकृताचे दोन भाग करून त्यांचे दोन वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये प्रत्यारोपण करण्यात पुण्यातील डॉक्टरांना यश आले आहे. पुण्यात पहिल्यांदाच झालेल्या या स्प्लिट लिव्हर ट्रान्सप्लांटमुळे अनेकांना आशेचा किरण मिळाला आहे.
मेंदूमृत तरुणाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवदान पुणे : नुकतीच दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला कोल्हापूरमधील १८ वर्षीय तरुण दुचाकी अपघातामुळे मेंदूमृत झाला. त्याचे हृदय, यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करण्यात आल्याने चार रुग्णांना नवजीवन मिळाले.
नवजीवन देण्यासाठी धडपडणारी ‘रीबर्थ फाउंडेशन’ पुण्यातील रीबर्थ फाउंडेशन ही संस्था अवयवदानासंदर्भात जनजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करते. या संस्थेने अवयवदानासंदर्भात माहिती देणारी टोल फ्री हेल्पलाइनही सुरू केली आहे. तसेच जनजागृतीसाठी शॉर्टफिल्म स्पर्धेसह विविध प्रकारचे उपक्रम ही संस्था राबवत असते. ‘लेणे समाजाचे’ या सदरात आज माहिती घेऊ या रीबर्थ फाउंडेशनच्या कार्याची
१०० ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करणाऱ्या संस्था, यंत्रणांचा सत्कार पुणे : पुणे शहराने नुकताच १०० ग्रीन कॉरिडॉर्सचा महत्त्वाचा टप्पा पार केला. यात अनेक संस्था आणि यंत्रणांचा महत्त्वाचा वाटा असून, रूबी हॉल क्लिनिकतर्फे त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language